स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षानंतरही काळ्या पाण्याचा उल्लेख जरी केला तरी आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते; डोक्यावर काळी टोपी, गोल काचेचा चष्मा, मध्यम बांधा आणि सदरा व धोतर घातलेले किंवा काळा कोट, पांढरा सदरा-पायजमा घातलेले एक व्यक्तिमत्त्व. ते म्हणजे मृत्युंजय, हिंदुहृदयसम्राट, दामोदरसूत ज्यांनी आपले कर या राष्ट्राला सावरण्यासाठी सरसावले. ज्यांना अगदी जन्मापासून विनायक म्हणून ओळख मिळाली.
भगूर (नाशिक) पासून इंग्लड, अंदमान, रत्नागिरी असा केवळ राष्ट्रीयत्व नाहीतर हिंदुत्वाचा सुरु झालेला जीवनप्रवास भारतमातेच्या चरणी जीवनपुष्प बनून अर्पित होण्यासाठी हा विनायकरुपी देह सज्ज झाला होता. त्यांच्या या तळमळीने मार्सलिस्टच्या समुद्रात मातृभूमीच्या ओढीने शरीराची तमा न बाळगता घेतलेली उडी जगभरातल्या महापुरुषांच्या आणि असामान्य देशभक्तांच्या यादीत या विनायकाला नेऊन ठेवते.
भगवान शंकराने दिलेल्या वरदानानुसार हिंदू धर्मात कुठल्याही पूजा-विधी अगोदर किंवा पूजना अगोदर गणेश पूजन करण्याचं वरदान गणरायाला प्राप्त आहे तसेच स्वांतत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांचं नाव घेयाच झालं किंवा यादी करायची झाली तर या विनायकाशिवाय ती पूर्णच होऊ शकणार नाही असच जणू वरदान भारतमातेने या विनायकला दिलंय. या भारतमातेला इंग्रजांच्या पाशवी विळख्यातून सोडवण्याकरता संसारावर, प्रपंचावर व घरादारावर तुळशीपत्र ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा करत, स्वांतत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने झपाटलेल्या क्रांतिकारकांमधील आणखी एक असामान्य नाव जे ऐकताच इंग्रज शिपायापासून ते गव्हर्नरपर्यंत कुणाच्याही छातीत धडकी भरावी, ते नाव म्हणजे 'स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर'.
सावरकर महान क्रांतिकारकांपैकी एक. त्यांनी सर्वतोपरी राष्ट्राची सेवा केली. देव, देश आणि धर्माची सेवा करताना अनेक उपदेश युवकांसाठी दिले. सावरकरांना शिक्षण, धर्म याच बरोबर राष्ट्ररक्षणात भयंकर रस होता हे त्यांच्या एकंदरीत जीवन प्रवासवरून दिसून येते. पण अश्यावेळी वैदिक धर्मात काळ आणि आवश्यकतेनुसार बदल अपेक्षित आहेत हे ही ते उत्तमरित्या जाणून होते. त्यामुळे त्यांच्या अनेक भाषणात तसे उल्लेख आढळून येतात. सावरकरांचं लिखाण आगीतही तेज निर्माण करेल आणि वाऱ्यातही क्रांतीचा वेग निर्माण करेल अश्या पद्धतीचे आहे. त्यामुळेच कि काय सावरकरांच्या अग्रलेखाने दिल्लीपासून ते इंग्लंडपर्यंत आग लागायची. सावरकर देशभक्त जरी असले तरी सर्वधर्मसमभावाचे विचार त्यांनी वेळीस अनुभवून ते त्यागले. त्या काळात हिंदूंचा कोणी कणखर नेता म्हणून ओळखला जात असेल तर, तात्याराव सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर.
धुमसत्या क्रांती काळात ज्वलंत हिंदुत्व मांडणारे सावरकर हे एकमेव अग्रणी हिंदू नेते असावेत. म्हणूनच कि काय जनतेने त्यांना हिंदुहृदयसम्राट हि पदवी बहाल केली. त्याग आणि बुद्धीची अफाट जोड असणारे तात्याराव हिंदूंचा विषय निघाला कि टोकाची भूमिका घेत,अतिशय परखड भूमिका मांडत. कारण हिंदू विघटनही पारतंत्र्याची मूळ अडचण त्यांनी जाणली.
त्यामुळे क्रांतीकार्याच्या दृष्टीने हिंदू तरुणांना एकत्र करून मार्गदर्शनही ते करत. सामान्य जीवनात राहूनही काही फारसं सुखमय जीवन नव्हतं तरीही, दस्तुरखुद्द भगवंताने याला विषाची परीक्षा समजलं तरी गैर वाटू नये. तो प्रसंग म्हणजे, ज्या दिवशी सावरकरांना काळ्या पाण्याची दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आली. न्यायालयात उपस्थित आप्तस्वकीय आणि स्नेहींच्या कानात कुणीतरी शिशाचा रस ओतावा असाच तो प्रसंग होता. डगमगतील ते तात्याराव कसले. त्यांच्या हास्य आणि आत्मविश्वासाने न्यायालयच काय तर ब्रिटिश सरकारची पाळमुळंच हादरवून टाकली. आपल्या समोर दुहेरी जन्मठेपेची शिक्षा उभी आहे ज्यामुळे आपल पूर्ण आयुष्य अंधारात जाणार आहे पण स्वातंत्र्याची रग भिनलेल्या व्यक्तीला कसली आहे चिंता? त्याच आपल्या निर्भय वाणीने सावरकर गरजतात माझी शिक्षा पूर्ण होईल पण त्यावेळी तुमचे सरकार नसेल...ह्याला म्हणतात भारतमातेची उपासना.
सावरकर जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी धर्माला अनुसरून सुधारणा घडवून आणल्या. धर्म त्यागून त्या धर्मात सुधारणा आणणे हे सोपे असते कारण आपल्याला धर्माची तत्व पाळायची गरज नसते पण आपल्याच धर्मात राहून आपल्याच लोकांचा रोष पत्कारून, धर्माच्या प्रतिष्ठेला धक्का लागू न देता सुधारणा घडवणे हे फार अवघड कार्य असतं. हेच अवघड कार्य स्वा. सावरकरांनी आपल्या उभ्या आयुष्यात ते हि अंधारी कोठडीत केले. दुहेरी जन्मठेप मिळाली आता स्वांतत्र्यसाठीच योगदान हातून गेले, आपल्या स्वप्नातले राष्ट्र हातून निसटले याचे दुःख करत बसले नाही तर जे जे हाती लागले त्यात हिंदू राष्ट्र निर्माण केले. आज सावरकर काहीवेळा ब्राम्हण म्हणून नाकारले जातात, तर काहीवेळा सोयीनुसार ते सर्वधर्मसमभावी म्हणून जवळ केले जातात. त्यावेळी मात्र हिंदूंनो, ‘मी हिंदु आहे’, हे सांगण्यास लाजू नका..याला तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून, आणि विरोध कराल तर तुमच्या विरुद्धही हिंदूराष्ट्र आपले भवितव्य पाहिजे तसे घडवेल"... हिंदू संघटक सावरकरांच्या या वाक्यांवर हेतुपुरस्सर पडदा टाकला जातो. अशा वेळी अतीव दुःख होत.
आर्यबंधु हो उठा उठा का मठासारखे नटा सदा ।
हटा सोडूनी कटा करू या म्लेंच्छपटा ना धरू सदा ।।
वयाच्या पंधराव्या वर्षी या ओळी रचणारे स्वा.सावरकर मात्र आजही हिंदू समाजात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली एक ब्राम्हण म्हणून, एक हिंदू द्रष्टा नेता म्हणून उपेक्षितच राहिले. समाजाने सावरकरांना नाकारले पण स्वांतत्र्यवीर सावरकरानी मात्र हिंदुस्थानवर नितांत प्रेम केले आणि शेवट पर्यंत करतच राहिले.....!!!!
आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
-नेहा रोहित तांबे



0 Comments